12 फेब्रुवारी : राज्यभरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना यात राज ठाकरेंचं ‘इंजिन’ रुळावरून खाली घसरलं की काय अशा चर्चा सुरू होती. मात्र, आता राज ठाकरेंचा झंझावती दौरा जाहीर झाला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ‘रेल्वे इंजिन’ व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर धडधडणार आहे. या प्रचारासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.
मुंबईत 14 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे मुंबईत एकूण 3 प्रचारसभा घेणार आहेत.
राज ठाकरेंची मुंबईत 14 फेब्रुवारीला विक्रोळीमध्ये पहिली सभा, त्याच दिवशी विलेपार्ले येथे दुसरी सभा होईल. तर तिसरी सभा 18 फेब्रुवारीला दादरमध्ये होईल.
15 तारखेला दिवा आणि ठाण्यात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. तर 16 फेब्रुवारीला पुण्यात आणि 17 फेब्रुवारीला नाशिकमध्ये प्रचार सभा होणार आहे.
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेशी जवळीक साधत युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला. मात्र, युतीच्या या प्रस्तावाला शिवसेनेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला.
दरम्यान, सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावल्याने राज ठाकरेंचं उशिराने धावणारं इंजिन वेळेत स्टेशन गाठणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv