17 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर शिवसेनेची भूमिका समजून घेण्यासाठी तसंच त्यांचं मन वळवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी रात्री उशिरा फोन केला. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर नोटाबंदीविरोधात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चात शिवसेनेचे खासदार सहभागी झाले होते. या माध्यमातून शिवसेनेने भाजपविरोधातील आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. यावेळी नोटाबंदीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याचंही समजते. दरम्यान, या चर्चेचा अधिकृत तपशील अद्यापपर्यंत समजू शकलेला नाही. मात्र, राजनाथ सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर शिवसेनेचा पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या निर्णयाला असणारा विरोध मवाळ होणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv