13 मार्च : भाजपच्या मनसेशी सलगीवरून नाराज झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी केला. पण सेनेतली खदखद अजून कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवरची नाराजी पुन्हा व्यक्त केली. युती तोडायची आमची इच्छा नाही. पण आमची फसवणूक होऊ नये, असा स्पष्ट इशाराच त्यांनी भाजपला दिलाय.
महाराष्ट्रात भाजपची सूत्रं कोणाकडे हे दोनच दिवसांत निश्चित होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. विशेष म्हणजे भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी महाराष्ट्रातले नेते देवेंद्र फडणवीस आहेत, हे सांगितलं होतं. तरीही उद्धव ठाकरेंनी आज हे वक्तव्य केलंय.
त्यामुळे भाजप नेत्यांच्या प्रयत्नांनंतरही सेना-भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही, हे स्पष्ट होतंय. दरम्यान, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधूनही आज भाजपला खडे बोल सुनावण्यात आलेत. बाळासाहेबांच्या हयातीत त्यांना यातना देऊन बाहेर पडणार्या फुटीरांशी भाजपचे नेते अलिंगन देत असल्याची टीका सामना मधून करण्यात आली. शिवसेनेचं ‘टेंगूळ’ आख्यान - आमच्या सांगण्यावरून नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, राजीवप्रताप रूडी यांनी अचानक फुटलेल्या टेंगुळांवर झंडू बाम चोळला आहे. हे खरं असलं तरी पुन्हा डोमेस्टिक व्हायोलन्स होणार नाही आणि टेंगुळ येणार नाही याची गॅरंटी काय ? - भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण त्याचे ‘राष्ट्रीय’पण शिवसेनेसारख्या पक्षांवर टिकून आहे. - युती एकाशी आणि सौदेबाजी दुसर्याशी, अशी अजब भूमिका भाजप घेतं अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. (सामनात नव्हे. तेव्हा उगाच सामनाच्या नावे आगपाखड करू नये) - नरेंद्र मोदींना पंतप्रधानकीच्या घोड्यावर बसवायचं असेल तर विश्वास निर्माण करावा लागेल. त्याशिवाय असाच विश्वास मिळत नाही. शिवसेना स्वत:ची लढाई लढण्यास समर्थ आहेच, पण साथ देणार्या मित्रांना खड्यासारखं बाजूला साराल तर अविश्वासाचा धोंडा डोक्यात पाडून घ्याल. - आज महाराष्ट्रात जी चुंबाचुंबी सुरू आहे, तशी चुंबाचुंबी शिवसेनेने वाघेलांशी केली नाही म्हणूनच नंतर नरेंद्र मोदींचा गुजरातमध्ये सूर्योदय होऊ शकला. - क्षणिक सुखासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या फुटीरांच्या गळ्यात गळे घालण्यापूर्वी मित्रवर्यांनी इतिहासाची पाने ती चाळायला हवीत…!