10 एप्रिल : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ते विवाहीत असल्याच्या सस्पेंसची अखेर कबुली दिली आहे. लोकसभेच्या बडोद्याच्या जागेसाठी काल अर्ज भरताना मोदींनी विवाहित असल्याची कबुली दिली. मोदींच्या पत्नीचं नाव जशोदाबेन असून त्या निवृत्त शिक्षिका आहेत.
सुमारे ४५ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींचा मोदींचा विवाह त्यांच्याच वयाच्या जशोदाबेन यांच्याशी झाला होता. मोदींचे मूळ गाव बडनगरपासून जवळच असलेल्या ब्राह्मणवाडामध्ये त्या राहतात. काल उमेदवारी अर्ज भरताना पत्नीचे नाव लिहिणार्या मोदींनी त्यांच्या पत्नीची सध्याची मिळकत, पॅन नंबक किंवा इन्कम टॅक्स रिटर्न याबाबत काहीही माहिती लिहीलेली नाही.
मोदींनी यापूर्वी 2001, 2002, 2007 आणि 2012 या वर्षांत लढलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना `वैवाहिक स्थिती`चा रकाना रिकामाच सोडला होता. यावर, काँग्रेसनं ‘वैवाहिक स्थिती’ लपवण्यावर आक्षेप घेतला होता. मोदींनी पत्नीची माहिती न दिल्यानं सुप्रीम कोर्टात जनहित याचिकाही दाखल झाली होती, मात्र सुपम कोर्टानं गेल्याच वर्षी ती याचिका फेटाळून लावली होती. कारण या गोष्टी निवडणूक आयोगानं पाहाव्यात असं सुप्रीम कोर्टाचं मत आहे.
आता मोदींचे हे सिक्रेट जगजाहीर झाल्याने विरोधकांच्या हातात एक नवा मुद्दा मिळाला आहे. कारण यापूर्वी एका सभेत बोलताना मोदींनी आपल्या पुढे - मागे कोणीही कुटुंबिय नाहीत, त्यामुळे आपण कधीच कोणासाठीच भ्रष्टाचार करणार नाही, असे विधान केले होते. मात्र आता त्यांनी जाहीरपणे आपल्या पत्नीचे नाव सांगितल्याने त्यांच्या विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाल्यागतच जमा आहे. मोदींनी केलेल्या या नोदींनी मात्र विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले आहे.
दरम्यान लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसांनंतर मोदी कधीच आपल्या पत्नीसोबत राहिलेले नाहीत. शिवाय मोदींनी कालच्या अर्जात त्यांच्या नावावर 1.50 कोटींची संपत्तीही जाहीर केली आहे.