19 डिसेंबर : अमेरिकेतल्या भारताच्या परराष्ट्र उच्चाधिकारी देवयानी खोब्रागडे यांना मिळालेल्या गैरवागणुकीसाठी अमेरिकेने फक्त खेद नाही तर माफी मागावी, अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री कमल नाथ यांनी केलीय. देवयानी यांच्या अटक प्रकरणाचा सगळीकडून तीव्र निषेध होत आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी काल बुधवारी या प्रकरणी खेद व्यक्त केला असून या सगळ्याचा भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर परिणाम होणार नाही, असंही म्हटलं होतं. भारतीय सुरक्षा सल्लागार समितीचे सचिव शिवशंकर मेनन यांच्याशी बातचीत करताना ते बोलले. तर अमेरिकन अंडर सेक्रेटरी वेंडी शेरमन यांनीही भारताचे परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांच्याशी संपर्क साधत झाल्या प्रकरणाबद्दल खेद व्यक्त केला. पण दोघांनी माफी काही मागीतली नाही. त्यामुळे अमेरिकेने जाहीर माफी मागावी, अशी मागणी कमल नाथ यांनी केली आहे. दरम्यान, हा सगळा प्रकार म्हणजे एक कारस्थान असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी केला आहे. या सगळ्या प्रकरणाची सरकार चौकशी करत असल्याचंही खुर्शीद यांनी म्हटलं आहे.