03 नोव्हेंबर: मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांना केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पेंग्विनची देखभाल योग्य पद्धतीने होते की नाही याबाबत या नोटीसमध्ये विचारणा करण्यात आली आहे.
दक्षिण कोरियाच्या मत्स्यालयातून 3 महिन्यांपूर्वीच 8 पेंग्विन आणण्यात आले होते. सेऊलमधल्या कोअेक्स मत्स्यालयातून 26 जुलैला या पेंग्विन पक्ष्यांना मुंबईच्या जिजामाता उद्यानात आणलं होतं. या पेेंग्विनसाठी 16 ते 18 डिग्री तापमान नियंत्रित करण्यात आलं होतं, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण आठ पेंग्विनपैकी एक मादी पेंग्विन काही दिवसांपासून निस्तेज झाली होती. ती काही खातही नव्हती. तिला श्वसनाचाही त्रास होत होता. या पेंग्विनच्या बऱ्याच चाचण्या घेण्यात आल्या. व्हेटर्नरी डॉक्टर्सनी तिच्यावर उपचारही केले पण ही मादी उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. अखेर 23 ऑक्टोबरला सकाळी सव्वाआठच्या सुमाराला या पेंग्विनचा मृत्यू ओढवला. या पेंग्विनला ग्रॅम निगेटिव्ह या जीवाणूचा संसर्ग झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
दरम्यान, यासंदर्भात केंदीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने पालिका आयुक्तांना स्पष्टीकरण करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. तसंच उरलेले पेंग्विन सुरक्षित आहेत का यासंदर्भात काही प्रश्न पालिका आयुक्तांना विचारलं आहे.
केंदीय प्राणी संग्रहालयाच्या या नोटीसमध्ये पालिका आयुक्तांना विचारण्यात आले आहे की, पेग्विंन ठेवलेली जागा योग्य आहे का?, अयोग्य सुविधांमुळे पेंग्विनचा मृत्यू झाला आहे का?, पेंग्विनची देखभाल योग्य केली जात आहे का? अशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. तसंच, या प्रश्नांवर पालिका आयुक्तांना लवकरात लवकर उत्तर देण्यास बजावण्यात आलं आहे. त्यामुळे पेंग्विनच्या मृत्यूचं भूत एवढ्या लवकर पालिका आयुक्तांच्या मानगुटीवरून उतरेल असं वाटत नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv