12 ऑक्टोबर : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून (आयएसआय) दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याच्या मुद्द्यावरून सरकार आणि लष्करी नेतृत्वात फूट पडल्याबाबतची बातमी देणाऱ्या पत्रकाराला पाकिस्तानातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध ‘डॉन’ या वृत्तपत्रासाठी काम करणारे पत्रकार सिरील अल्मेडा यांनी आज ट्विट करून ही माहिती उघड केली.
‘हक्कानी नेटवर्क‘ आणि “लष्करे-तोयबा‘सारख्या दहशतवादी संघटनांना मदत करण्याच्या ‘आयएसआय’च्या धोरणामुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटे पडण्याची वेळी आली आहे. त्यामुळे विद्यमान सरकार आणि ‘आयएसआय’ यांच्यात संघर्ष भडकला असून, त्यांच्यात फूट पडली असल्याची बातमी ‘डॉन’मध्ये छापून आली होती. या बातमीमुळे संतापलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी अशा प्रकारची दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
अल्मेडा यांनी आज ट्विट करून सांगितलं, की देशाबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आलेल्यांच्या यादीत माझ्या नावाचा समावेश करण्यात आला असून, त्याचे पुरावेही मला दाखवण्यात आले. त्यामुळे मला आश्चर्य वाटलं आणि धक्काही बसला. पाकिस्तान ही माझी मातृभूमी असून, मला इतरत्र कोठेही जाण्याची इच्छा नाही. नेमकं काय चुकलं हेच मला कळेनासे झालं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv