17 डिसेंबर : अमेरिकेतील भारतीय वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांची व्हिसा फसवणूक प्रकरणी न्यूयॉर्क इथे अटक केली होती. आणि चौकशी दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये कपडे उतरवून झडतीही घेण्यात आली. अमेरिकन पोलिसांकडून अत्यंत वाईट वागणूक दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा प्रकार अघडकीस आल्यानंतर केंद्राने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली असून अमेरिकेच्या भारतातल्या अधिकार्यांच्या हक्कांवर भारताकडून निर्बंध आणण्यात येणार असल्याचे समजते.
लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार आणि नॅशनल सिक्युरिटी ऍडव्हायजर शिवशंकर मेनन यांनी देवयानी खोब्रागडेंच्या अटकेचा निषेध म्हणून भारत दौर्यावर आलेल्या अमेरिकच्या शिष्टमंडळाची भेट घ्यायला नकार दिला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही या भेटीस नकार दिला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनीही ही भेट रद्द केली आहे. यासोबतच या शिष्टमंडळाची कुणीही भेट न घेण्याचे आदेश मंत्र्यांना देण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी देवयानी खोब्रागडेंचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी आज मंगळवारी दुपारी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आहे.