28 नोव्हेंबर : तेहलका बलातकार प्रकरणाचे आरोपी तेजपालने त्याला शनिवारपर्यंत मुदत देण्याची विनंती गोवा पोलिसांना पत्र लिहून केली आहे. गोवा पोलिसांनी पाठवलेली नोटीस उशीरा मिळाल्याने हजर राहण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ द्यावा अशी विनंती तेजपाल यांनी पोलिसांना केली आहे. तेजपाल यांच्यावर आपल्या कनिष्ठ सहकारी महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून गोवा पोलिसांनी त्यांना गुरुवारी दुपारी तीनपर्यंत जबानीसाठी हजर होण्याचे समन्स काढले होते. दिल्ली हायकोर्टानेही अटकपूर्व जामीनावर अद्याप निर्णय न दिल्याने तेजपाल यांना आज अटक होण्याची दाट शक्यता होती. मात्र आता तेजपाल यांनी गोवा पोलिसांना एक पत्र पाठवून हजर राहण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ द्यावा अशी विनंती केल्याचे वृत्त आहे. पण या पत्राला गोवा पोलिसांनी अजून तरी उत्तर दिलेलं नाही. दरम्यान, तेहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांनी राजीनामा दिला आहे. या प्रकरणात शोमा चौधरी तरूण तेजपाल यांना पाठीशी घालतायेत, असा आरोपही करण्यात येत आहेत. पण हे सगळे आरोप खोटे अयल्याचे शोमा यांनी सांगितले. शोमा चौधरी यांच्या राजीनाम्यामुळे या प्रकरणात तहलकामध्ये राजीनामा दिलेल्यांची संख्या आता 7 झाली आहे.