21 फेब्रुवारी : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर इतर पक्षांना खास करुन अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला पाठिंबा देण्याबाबत सुतोवाच केलंय. आयबीएन लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी 17 मुद्यांच्या अटीवर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
कोणत्याही राजकीय पक्ष आणि पार्टीवर आपला विश्वास नसला तरी आगामी निवडणुकीपुरतं आपण मांडलेल्या 17 मुद्द्यांना पाठिंबा देणार्या आणि चारित्र्यवान नेत्यांना लोकसभा निवडणुकीकरता पाठिंबा देऊ तसंच प्रचारही करू असं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलंय.
ममता बॅनजीर्ंप्रमाणे जर अरविंद केजरीवाल मेधा पाटकर यांच्या आप पक्षानं ही जर 17 मुद्दे मान्य केले तर त्यांचाही प्रचार करू असंही अण्णा म्हणाले.
तसंच अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्या गॅस दरवाढीबाबतच्या मुद्द्याचं समर्थन केलं. गॅसची मालकी असलेल्या या कंपनीने मनाप्रमाणे दर वाढवतात. परिणामी याचा बोजा जनतेवर लादला जातो. केजरीवाल यांनी मुकेश अंबानींशी संबधांवरून विचारलेल्या प्रश्नांवर मोदी आणि राहुल गांधी गप्पच राहतील जर ते बोलले तर त्यांच्या अंगलट येईल असंही अण्णा म्हणाले. या मुद्दयावर काँग्रेस-भाजपची मिलीभगत आहे. या मुद्दावर सत्ताधार्यांनी आवाज उठवणे गरजेच आहे पण सत्ताधारीही काही बोलत नाही आणि विरोधकही आवाज उठवत नाही असा आरोपही अण्णांनी केलाय.