23 नोव्हेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांच्यावर आता दबाव वाढत चालला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पुढच्या कारवाईला सुरूवात केलीय. गोवा पोलिसांची टीम दिल्लीत आहे आणि आज शनिवारी संध्याकाळी तेजपाल यांची भेट घेणार असल्याचं गोव्याच्या पोलीस महासंचालकांनी सांगितलंय.
तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांनी तपासात सहकार्य केलं नाही तर त्यांच्याविरोधातही कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. पीडित तरुणीने पोलिसांकडे अजून तक्रार केलेली नाहीय.पण पीडित तरुणी आता पोलिसांना जबाब द्यायला तयार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
तेजपाल आणि तहलकाच्या व्यवस्थापक शोमा चौधरी यांची चौकशी केल्यानंतर पोलीस तरुणीचा जबाब नोंदण्याची शक्यता आहे. तेजपालना अटक करण्याची शक्यताही पोलिसांनी फेटाळलेली नाहीय. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित ई-मेलचे डिटेल्सही ताब्यात घेण्याची शक्यता आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवलंय.