16 सप्टेंबर : जळगाव महापालिकेच्या महापौरपदासाठी सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीच्या राखी सोनावणे यांची बिनविरोध निवड झालीय तर उपमहापौरपदासाठी सुनील महाजन यांची निवड झालीय. या निवडीबाबत अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. सोनावणे आणि महाजन हे दोघंही खान्देश विकास आघाडीचे नगरसेवक आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत सुरेश दादा जैन यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी आणि मनसेनं तटस्थ राहाण्याची भूमिका घेतली. महापालिका निवडणुकीत खान्देश विकास आघाडीला सर्वाधिक म्हणजे 34 जागा मिळाल्या होत्या. त्यांचे मित्रपक्ष असणार्या राष्ट्रवादीकडे 11 नगरसेवक आहेत तर जळगावमध्ये मोठी मुसंडी मारणार्या मनसेकडे 12 नगरसेवक आहे. आज महापौरपदाच्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी आणि मनसेनं तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्यामुळे खान्देश आघाडीच्या महापौरपदाच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा झाला.