10 मार्च : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे शिवसेनेची नाराजी ओढवून घेणारे भाजप नेते नितीन गडकरी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यासाठी नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या काही जेष्ठ नेत्यांकडून प्रयत्न चालवल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
आपण राज यांची भेट महायुतीच्या फायद्यासाठी घेतलीय. मनसेनं निवडणूक लढू नये, हीच माझी भूमिका होती. पण या भेटीचे राजकीय तर्कवितर्क काढण्यात आले, असं गडकरींनी म्हटलंय. आणि या भेटीकडे गैरसमजूतीतून पाहू नये, अशी विनंती शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे केलीय
. आपलं हे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवावं, अशीही विनंती गडकरींनी केलीय. दुसरीकडे शिवसेना जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकार्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या (मंगळवारी) उद्धव ठाकरे घेणार आहेत. या भेटीत उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आदेश देतात, याकडे भाजपचं लक्ष लागलंय.
तर दुसरीकडे मात्र भाजप नेत्यांची ‘कृष्णकुंज’ भेट सुरूच आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी अपेक्षेप्रमाणे 10 उमेदवार रिंगणात उभे रहाणार आहेत. पण, 9 व्या जागेवर दावा सांगणार्या उमेदवाराला मतांची बेगमी करावी लागणार असल्यानं चुरस निर्माण झालीय. मनसेची मतं यात निर्णायक ठरणार आहेत. त्यासाठीच भाजप नेते विनोद तावडे आणि आशिष शेलार आज पुन्हा कृष्णकुंजवर गेले. आणि राज ठाकरेंची भेट घेतली. आठवडाभरात तब्बल चौथ्यांदा भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.