17 डिसेंबर : अण्णांचं पत्र हे अतिशय प्रेरणादायी होतं. त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. आम्ही देशाला सक्षम लोकपाल देण्यास कटिबद्ध आहोत अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अण्णा हजारे यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे.
अण्णा हजारे यांनी 14 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांना पत्र लिहून सरकारनं लोकपाल विधेयक राज्यसभेत मांडल्याबद्दल सरकारचे आभार मानले होते. त्या पत्राला आज राहुल गांधींनी उत्तर दिलंय. दोन दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकपाल विधेयकाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असून राज्यसभेत लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु असं आश्वासन राहुल यांनी दिलं होतं.
तसंच लोकपालच्या कक्षेत सीबीआय असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर अण्णांनी सरकारी लोकपाल विधेयकावर समाधानी असल्याचं स्पष्ट केलं होतं.
राहुल गांधींचं अण्णांना पत्र “आपण लिहिलेल्या पत्राबद्दल आपले आभार. आपलं पत्र हे अतिशय प्रेरणादायी होतं. आम्ही देशाला सक्षम लोकपाल देण्यास कटिबद्ध आहोत. आम्हाला या संदर्भातल्या आपल्या भूमिकेबद्दल आदर आहे. आपल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.”- राहुल गांधी