14 फेब्रुवारी : मुंबईतल्या अंधेरीमध्ये कवडीमोल भावानं लाटलेला भुखंड अखेर केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला यांनी सरकारकडे परत केला. सुमारे 100 कोटी किंमतीचे 2 भुखंड राजीव शुक्लांच्या B.A.G. या सोसायटीने अवघ्या 1 लाख 34 हजाराला भाडेपट्टीवर घेतले होते.
15 वर्षांच्या भाडेपट्टीवर हे दोन्ही भुखंड लाटताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीव शुक्ला यांना जमीन परत करण्याची सुचना केली होती. त्यानुसार राजीव शुक्लांच्या संस्थेनं गुरुवारी सर्व जमीन सरकार दरबारी जमा केली.
पण जमीन परत करताना या जमिनीवरचं अतिक्रमण हटवणं, झोपड्यांचं पुनर्वसन करणं आणि कुंपण घालणं या खर्चापोटी सरकारकडे 2 कोटी 20 लाख रुपये भरपाईची मागणी शुक्ला यांनी सरकारकडे केलीय. आता सरकार पैसे परत करणार का हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीय. या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर राज्य सरकारने ही कारवाई केली.