27 डिसेंबर : इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या आजीवन अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची निवड झालीय. दिल्लीमधल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची एकमताने निवड झाली. सुरेश कलमाडी हे कॉमनवेल्थ घोटाळ्यात आरोपी असतानाही त्यांची निवड झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. अभय चौटाला यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसलाय, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी दिलीय. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ आणि त्यानंतर कारवाई करू, असं ते म्हणाले. आम्ही अहवाल मागवलाय, असंही त्यांनी सांगितलं. सुरेश कलमाडी हे १९९६ ते २०११ या काळात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. दिल्ली कॉमनवेल्थ घोटाळ्यात भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांना १० महिने तुरुंगातही जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. अभय चौटाला हेही २०१२ ते २०१४ या काळात इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. पण त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.सुरेश कलमाडी आणि अभय चौटाला यांची इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यामागे राजकीय हितसंबंध दडलेले आहेत, अशी टीका क्रीडाक्षेत्रातल्या तज्ज्ञांनी केलीय. ज्या भाजपने कलमाडींविरुद्ध कॉमनवेल्थ घोटाळ्यामध्ये निदर्शनं केली त्याच भाजप सरकारच्या काळात सुरेश कलमाडींची पुन्हा इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालीय. त्यामुळे राजकीय चर्चेलाही उधाण आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv