23 सप्टेंबर : आयपीएल फिक्सिंग प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या वादानंतरसुद्धा बीसीसीआयचे अध्यक्ष एन श्रीनिवासन पुन्हा एकदा बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. आयपीएल फिक्सिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय. त्यात श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पन यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. पण या प्रकरणाचा आपल्याशी संबंध नाही असं सांगत श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा हात झटकलेत. आता श्रीनिवासन यांना बोर्डाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचे वेध लागलेय. पटियाला हाऊस कोर्टाने बीसीसीआयच्या 25 सष्टेंबर रोजी होणार्या विशेष कार्यकारिणीच्या सभेला स्थगिती दिलीये. पण तरीही अध्यक्षपदाची चुरस चांगलीच रंगलीये. श्रीनिवासन यांना पुन्हा अध्यक्ष होण्यास साऊथ जोनच्या दोन बोर्डांचा पाठिंबा आवश्यक आहे. जर साऊथ झोनमधल्या कोणत्याही दोन बोर्डांनी श्रीनिवासन यांच्या नावाचं अनुमोदन दिलं तर श्रीनिवासन अध्यक्षपादासाठी उभे राहू शकतात. सध्याच्या परिस्थितीनुसार साऊथ झोनमधून श्रीनिवासन यांना 6 पैकी तब्बल 5 संघटनांचा पाठिंबा आहे. केरळ, आंध्र, कर्नाटक, हैदराबाद आणि स्वतः श्रीनिवासन यांचं तामिळनाडू क्रिकेट बोर्ड श्रीनिवासन यांच्या पाठिशी आहे. तर फक्त गोवा आणि क्रिकेट बोर्डाने त्यांना विरोध केलाय. बिहार क्रिकेट बोर्डाने तर सर्वोच्च न्यायालयात श्रीनिवासन यांच्याविरोधत एक याचिकाही दाखल केलीय. श्रीनिवासन यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यापासून रोखावं अशी मागणी करणारी याचिका दाखल केलीय. दरम्यान, IPL स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पाकिस्तानचे अंपायर असद रौफ यांनी आपल्यावरचे सर्व आरोफ फेटाळून लावलेत. अंपायरिंगच्या कारकिर्दीत आपण कधीही सट्टेबाजी केली नाही, असं त्यांनी आयबीएन नेटवर्कशी बोलताना स्पष्ट केलं.