19 मार्च : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा जाहीर करुन शिवसेनेला आणखी एक धक्का दिला आहे. मावळ आणि रायगड या मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्याऐवजी शेकापच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आज कृष्णकुंजवर जाऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. या बैठकीत मावळ आणि रायगडच्या जागेसंदर्भात चर्चा झाली. रायगड आणि मावळ या लोकसभा मतदारसंघांमध्ये शेकाप आपले उमेदवार उभे करतय आणि त्या उमेदवारांना मनसे पाठींबा देणार असल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.