उदय जाधव, मुंबई. 20 नोव्हेंबर : मुंबईतील दादर इथं इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतून कागदोपत्री मंजुरी मिळवली. मात्र प्रत्यक्षात काम अजूनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे दलित संघटनांनी सहा डिसेंबर आधी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलाय.इंदू मिलच्या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारावं, या मागणीसाठी दलित संघटनांनी अनेक आंदोलनं केली. या आंदोलनामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपलं दिल्ली कनेक्शन वापरुन आवश्यक ती मंजुरी मिळवली. पण स्मारकाचं काम मात्र अजून सुरू झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय कांबळे यांनी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिलाय. सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्ष आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनीही स्मारकाचं सहा डिसेंबरच्या आधी भूमीपूजन करावं अशी मागणी केलीय. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचं आंतरराष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी दिल्लीमध्येही वेगानं हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे दलितांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं श्रेय मिळवण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चढाओढ सुरू झालीय.