30 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे चार दिवसांच्या दौर्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. पण त्यांना अटक होण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या अटकेवरून राज्य सरकार आणि पोलिसांमध्ये टोलवाटोलवी सुरू आहे. राज्य सरकारने ही जबाबदारी पोलिसांवर ढकलली मात्र पोलीस अटक करण्याची शक्यता नाहीये. राज ठाकरेंच्या चिथावणीखोर भाषणाचा अहवाल विधी आणि न्याय विभागाकडून गृहविभागाकडे येत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाईची शक्यता धूसर आहे. टोलबाबत चिथावणीखोर भाषण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर आजपासून सुरु होणारा राज ठाकरेंचा 4 दिवसांचा पुणे दौरा चर्चेत आला आहे. चार दिवसांच्या दौर्याच्या कार्यक्रमानूसार उद्या सकाळी मनसेच्या पदाधिकार्यांचा मेळावा बीएमसीसी कॉलेजमध्ये होणार आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीची रणनिती ठरणार आहे. 1 फेब्रुवारीला राज ठाकरे पुण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेणार असल्याचं समजतेय. तर 2 फेब्रुवारीचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईहून पुण्याकडे निघाल्यानंतर या प्रवासात राज ठाकरे यांना एकाही टोल नाक्यावर अडवण्यात आलं नाही. वाशीपासून ते तळेगावपर्यंत कोणत्याही टोल नाक्यांवर राज ठाकरे यांची गाडीला अडवण्याचं धाडस केलं नाही. उलट राज ठाकरे येणार याची सूचना आधीच मिळाल्याने टोलनाके १० मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आले होते. याचा फायदा त्यावेळी प्रवास करणार्या सर्वसामान्यांना मिळाला.