मुंबई - 29 एप्रिल : पावसाचा प्रत्येक थेंब जिरला पाहिजे यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहे. जलयुक्त शिवार योजना ही आता सरकारी राहिली नसून ती आता लोकचळवळ झाली आहे. या लोकसहभागातून येत्या 4 ते 5 वर्षांत महाराष्ट्र हे देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य बनवू आणि याचं श्रेय महाराष्ट्राच्या जनतेचं असणार आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतच्या जागर पाण्याचा पाणी परिषदेत व्यक्त केलाय. तसंच शेतकर्यांच्या शेतीला जोपर्यंत पाणी देणार नाही. तोपर्यंत आत्महत्या थांबवता येणार नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दुष्काळाने होरपळणार्या महाराष्ट्रापुढे पाणीटंचाई प्रश्न भेडसावत आहे. गावच्या गाव पाण्याअभावी ओस पडलीये. शहरांनाही पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहे. पाणी संकटाचा सामना कसा करता येईल यासाठी आयबीएन लोकमतने जागर पाण्याचा ही मोहिम हाती घेतली. आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पाणी परिषद पार पडली. या परिषदेची सांगता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती झाली. या परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील पाण्यासाठी कार्य करणार्या 12 ‘पाणीदार’ माणसांचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेली दोन-तीन महिने पाण्याचा प्रश्न दुष्काळामुळे ऐरणीवर आला. तीव्र पाणीटंचाईने होरपळणारा आपला लातूर जिल्हा हा दुदैर्वाने देशाची दुष्काळाची राजधानी ठरलाय अशी खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
सरकारमध्ये आल्यानंतर विकेंद्रीत पाण्याचे साठे तयार करण्याचे काम हाती घेण्यात आला. पाणी नियोजनासाठी राज्यात अशा 14 योजना सुरू होत्या. पण, या योजनांना पुरवठा करण्यात सरकारची दमछाक होत होती. अखेर या सर्व योजना एकत्र करून काम सुरू केलं. आज ‘जलयुक्त शिवार योजना’ ही फक्त सरकारी योजना म्हणून राहिली नाही ती आता लोकचळवळ झालीये. लोकं स्वता:हुन पुढे येत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनी जिरला पाहिजे असं कार्य सुरू आहे. या लोकसहभागातून येत्या 4 ते 5 वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करून दाखवू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तसंच पाण्याच्या नियोजनाची नवी दिशा राज्य सरकारने हाती घेतली आहे. पाण्याचा अनिर्बंध वापर रोखण्यासाठी ठिबक सिंचनासारखे अनेक प्रयत्न सुरू असून पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल यावर भर दिला जात आहे. यासाठी जास्तीत-जास्त निधी महापालिकांना पाण्याच्या पुनर्वापरासाठी देण्यात येत आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयबीएन लोकमतच्या जागर पाण्याचा या मोहिमेचंही कौतुक केलं. या परिषदेत 12 पाणीदार माणसांचा सन्मान करण्यात आला. आता पुढच्या वर्षी अशीच माणसं समोर येतील आणि तुम्हाला 100 पाणीदार माणसांचा सन्मान करावे लागले अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आयबीएन लोकमतच्या टीमचं आणि पाणीदार माणसांचं अभिनंदन केलं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधी दोन सत्रांमध्ये पाण्याचं समन्यायी वाटप आणि नियोजन आणि राज्यातील पाणीटंचाईला ऊस पीक कारणीभूत आहे का ? परिसंवाद पार पडले. या परिसंवादाला जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, समाजसेवक डॉ. विकास आमटे, भारत खानापूरकर, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, ऊस ब्राझीलचा-भारताचा’चे लेखक दत्ता सावंत, जल अभ्यासक माधव कोटस्थाने, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि शिरपूर पॅटर्नचे प्रणेते सुरेश खानापुरकर उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv