17 सप्टेंबर : मराठा आरक्षणाबाबत आमच्याकडे बोट दाखवू नका,आम्ही फक्त बोललो नाही तर करून दाखवलं असं प्रतिउत्तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं. तसंच तुम्हाला त्रुटी दिसतायेत तर त्या दुरूस्त करा. पण तुम्हाला हे करायचचं नाही अशी टीकाही चव्हाण यांनी राज्य सरकारवर केली.
मराठा समाजाचा क्रांती मोर्च्यात आतापर्यंत कोणताही नेता सहभागी नाहीये. पण या मोर्च्यावरुन राजकीय वातावरण आता तापत चाललंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आतापर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री होऊन गेले पण आज मराठा समाजाची परिस्थिती जैसे थेच आहे असा टोला त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना लगावला होता. याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिलंय.
आज मराठा समाजातील खदखद या मोर्च्यातून समोर येतेय. मी मुख्यमंत्री असतांना सुद्धा हे प्रश्न माझ्यासमोर आले होते. आम्ही मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. कोर्टात या निर्णयाला आवाहन दिले जाईल हे माहित असून सुद्धा आम्ही निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं होतं अशी आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांना करुन दिली.
तसंच ऍट्रॉसिटी कायद्याचा दुरूपयोग होतोय असं केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह अनेक दलित नेत्यांना वाटतंय. मग यात ऍट्रोसिटी कायद्यात काय बदल केले पाहिजेत हे सूचवा आणि मसुदा तयार करा. हे केल्यानंतरच चर्चा करा. काहीही न करता उगाच चर्चेच गुर्हाळ वाढवून उपयोग नसल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात आहे. ते काय करणार हे सांगितलं पाहिजे असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv