11 एप्रिल : मनसेला टाळीवरुन महायुतीत उठलेलं वादळ शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांनी मनसेची आठवण काढलीय. मनसे महायुतीत असती तर महायुतीची मतांची टक्केवारी वाढली असती, अशी स्पष्ट कबुली भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी दिली आहे.
मात्र मनसे महायुतीत नाही. मनसे आणि शिवसेनेला एकत्र आणण्याचा भाजपनं खूप प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही असंही मुंडे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच महायुतीच्या मतदारांनी मनसेला मतदान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही त्यांनी यावेळेला स्पष्ट केलं.
यावेळी मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली नाही. आपल्याला राज्याच्या राजकारणात परतण्याची इच्छा आहे, असे संकेतसुद्धा यावेळेस गोपीनाथ मुंडेंनी दिले. विशेष म्हणजे दोनच दिवसांपुर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पुण्यात ‘पाठिंबा मागितला नाही तर देता कशाला?’ असा सवाल राज यांचं नाव न घेता विचारला होता. जर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यायचाच असेल तर आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करा असा सल्लाही राजनाथ यांनी दिला होता. त्यानंतर आज मुंडे यांनी मनसे महायुतीत नसल्यामुळे खंत व्यक्त केलीय.