
13 मे : ऐन दुष्काळात तहानलेल्या लातूरला पाणी पुरवठा करणार्या रेल्वेच्या ‘जलदूत’चे चार कोटींचे बिल मागे घेण्यात आल्याची घोषणा आज (शुक्रवारी) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. पाणी पुरवठा करणारी रेल्वे व्यावसायिक उद्देशाने चालवत नसल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त लातूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे मंत्री आणि प्रशासनाने सामान्य जनतेपर्यंत पाणी नेण्यासाठी झटपट पाऊले उचलत खास लातूरसाठी दिलेली पाणी एक्स्प्रेस ही खर्या अर्थाने ‘जलदूत’ ठरल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरांतून येत होती. ‘जलदूत’च्या माध्यमातून आतापर्यंत 6 कोटी 20 लाख लिटर पाणी लातूरकरांसाठी पाठवण्यात आलं आहे. मात्र रेल्वेने पाण्याच्या वाहतुकीचे चार कोटींचे बिल लातूरच्या जिल्हाधिकार्यांना पाठवले आणि लातूरकरांना पाणी चांगलंच महाग पडल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. या चर्चेला प्रभूंच्या घोषणेनी पूर्णविराम दिल्या गेला आहे.
ज्या भागांमध्ये दुष्काळग्रस्तांसाठी रेल्वेच्या मदतीने पाणी पुरवठ्याचे काम सुरू आहे, त्यावर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे लक्ष आहे. लातूरच्या जिल्हा प्रशासनाने ‘जलदूत’च्या बिलाची मागणी केली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने बिल धाडले होते. मात्र आता हे बिल मागे घेण्यात आलं आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यासाठी आलेल्या खर्चावर रेल्वे मंत्रालय स्वतंत्रपणे विचार करणार आहे, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv