31 डिसेंबर : देवयानी खोब्रागडे अटक प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन सरकारने देवयानीवरचे आरोप मागे घेण्यास नकार दिला आहे. त्याबरोबरच 13 जानेवारीला देवयानीवर खटला दाखल होणार आहे. देवयानीला संयुक्त राष्ट्राचं संरक्षण असल्यामुळे देवयानीला कोर्टात हजर रहावे लागणार नाही आणि त्यांच्यावरचा खटला स्थगित राहील. या प्रकरणाचा भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर परिणाम होऊ नये, अशी आशा ही व्यक्त केली आहे.
अमेरिकेतल्या भारतीय वरिष्ठ राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे अटक प्रकरणाची अंतर्गत चौकशी होणार होती. त्यासाठी अमेरिकेचं व्हाईट हाऊस राष्ट्रीय सुरक्षा मंडळ, परराष्ट्र विभाग आणि न्याय विभाग यांना सहभागी करुन घेणार होते. पण त्या आधीच 13 जानेवारीला त्यांच्यावर आरोप पत्र दाखल करण्यात येणार आहे. देवयानीविरोधात व्हिसासाठी खोटी माहिती दिल्याचा आणि मोलकरणीचं आर्थिक शोषण केल्याचा आरोप आहे. तर हे आरोप अतिशय गंभीर असून ते मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही असं अमेरिकेचं म्हणण आहे. या प्रकरणात दोषी सिद्ध झाल्यास देवयानीला 15 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.