27 नोव्हेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल यांना गोवा पोलिसांनी समन्स बजावलंय. त्यांना उद्या गुरुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. तर तेजपाल यांच्या हंगामी अटकपूर्व जामीन अर्जावरचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने 29 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे.
आपण गोवा कोर्टातही अर्ज करणार असल्याचंही तेजपाल यांच्या वकिलांनी सांगितलंय. दरम्यान, पीडित तरुणीचा गोव्याच्या मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवण्यात येतोय. मंगळवारी तिचा गोवा पोलिसांसमोर तब्बल आठ तास जबाब नोंदवण्यात आला.
हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तहलकाच्या मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी यांचंही नाव एफआयआरमध्ये टाकलं जाण्याची शक्यता आहे. आपल्याविरोधातली तक्रार ही राजकीय हेतून प्रेरीत असल्याचा आरोप तेजपाल यांनी केलाय. पण, गोवा पोलीस कोणत्याही दबावाखाली नसल्याचं मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केलंय.