19 नोव्हेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या मॅचच्या तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एमसीएकडे विचारणा केलीय. एमसीएनं जिमखाने आणि क्लबना दिलेल्या पासेसची माहिती पोलिसांनी मागितलीय. पण, एमसीएनं अजून तरी कुठलीही माहिती पोलिसांना दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एमसीए मुंबई पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं कळतंय. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचनं शिवाजी पार्क जिमखाना, इस्लाम जिमखाना आणि बॉम्बे जिमखानाच्या काही सदस्यांना अटक केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच संस्मरणीय तर राहिली. पण त्याचबरोबर या मॅचच्या तिकीटांचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर समोर आला. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्राँचनं शिवाजी पार्क जिमखाना, इस्लाम जिमखाना आणि बॉब्मे जिमखानाच्या काही सदस्यांना अटक केली. - शिवाजी पार्क जिमखान्याच्या सुर्यकांत चव्हाण यांनी या मॅचचे 15 पास तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांना विकले
- गरवारे क्लबचे जनक गांधी, बॉम्बे जिमखान्याचे प्रेमनाथ आणि इस्लाम जिमखान्याच्या अजय जाधव यांनी या मॅचचे 6 पास प्रत्येकी 25 हजार रुपयांना विकले - क्लब्समधूनही पासेसची फेरफार झाल्याचं समोर येतंय जिमखान्यांना आणि क्लब्सना मिळालेले पास हे विकता येणार नसताना ही, त्यांची कशी अफरातफर केली गेली याची माहितीही आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलीये. या सगळ्या पासेसचा काळा बाजार झाल्याचं कळतंय. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलिसांनी वेगानं हाती घेतलाय. यानंतरही जिमखाने आणि क्लब्सच्या अनेक सदस्यांची चौकशी होणार असल्याचं मुंबई पोलिसांच्या सूत्रांकडून समजतंय. तिकीटांचा झालेला काळाबाजार आणि सर्वसामान्य फॅन्सना मिळालेली फक्त 5 हजार तिकीटं यामुळे मुंबई टेस्टला गालबोट लागलंय.