01 फेब्रुवारी : शीतल म्हात्रे प्रकरणी अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवारी)तिन्ही नगरसेविकांची भेट घेतली. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ आणि भाजपच्या नगरसेविका मनीषा चौधरी यांची उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर जवळपास दीड तास ही चर्चा झाली.
आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. विनोद घोसाळकर सेनेच्याच नगरसेविकांना त्रास देतात अशी तक्रार या तीनही नगरसेविकांनी केली होती. या प्रकरणी कोणी कृष्ण होईल का? अशी हाक शुभा राऊळ यांनी सोशल साईटवर प्रसिद्ध केली होती.
त्यामुळे सेनेतला वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. एवढंच नाही तर घोसाळकर यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे आणि उद्धव ठाकरे भेट देत नसल्यामुळे शीतल म्हात्रे यांनी राजीनामा दिला होता. या प्रकरणी महिला आयोगाने दखल घेऊन घोसाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. मात्र घोसाळकर यांनी तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला होता. सुरूवातील उद्धव यांनी हा पक्षातला अंतर्गत मुद्दा आहे कुणी नाक खुपसू नये अशी भूमिका घेतली होती. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले. अखेर मोठ्या वादानंतर आज उद्धव यांनी तिन्ही नगरसेविकांची भेट घेतली.