06 एप्रिल : राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे अडचणीत येऊ शकतात. आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआय त्यांचीही चौकशी करणार असल्याची शक्यता आहे. देवयानी खोब्रागडे यांचा आदर्शमध्ये फ्लॅट आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी खोटी माहिती दिली होती आणि सरकारी कोट्यातून मिळालेल्या फ्लॅटची माहिती दडवून ठेवली होती, असा पुरावा सीबीआयकडे आहे. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी देवयानी यांच्याकडे पैसा कुठून आला याचा तपास घेतला जात आहे. काही महिन्यांपूर्वी व्हिसा गैरव्यवहारप्रकरणी देवयानी यांना अमेरिकेत अटक झाली होती. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले होते. भारतानेही हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. त्यानंतर देवयानी यांची पुन्हा भारतात बदली करण्यात आली होती. एकीकडे व्हिसा प्रकरण तर दुसरीकडे आदर्श घोटाळ्यात नाव आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.