02 जानेवारी : बहुचर्चित आदर्श घोटाळ्याचा अंतिम अहवाल पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळात चर्चेसाठी येणार आहे. काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या प्री कॅबिनेट बैठका लांबल्याने मंत्रिमंडळाची बैठक उशिरा सुरु झालीय. त्यात शेवटच्या सत्रात आदर्शच्या अहवालावर मुख्यमंत्री सहकार्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी आदर्श अहवाल स्वीकारण्याचा फेरविचार होण्याची शक्यता आहे.
कोणताही ठोस निर्णय जरी घेतला गेला नाही तरीही मंत्रिगटाची स्थापना किंवा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमला जाण्याची शक्यता आहे. या शिवाय आज घेतल्या जाणार्या निर्णयांसंदर्भात मुख्यमत्र्यांनी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे.
दरम्यान, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनीसुद्धा मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहिलंय. यामध्ये आदर्शच्या अहवालावर फेरविचार करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाला घेता येणार नाही तो अधिकार आता विधीमंडळाकडे गेला आहे. त्यामुळे विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावूनच निर्णय घ्यावा लागेल अशी मागणी विनोद तावडे यांनी पत्रात केली आहे.