
13 फेब्रुवारी : अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये ओरोव्हिल धरण फुटण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे एक लाख 80 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलंय. कॅलिफोर्नियामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे या धरणातून प्रचंड वेगाने पाणी वाहतंय. ओरोव्हिल धरण हे अमेरिकेतलं सर्वात उंच धरण आहे. ओरोव्हिल धरण तुडंब भरल्यामुळे धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडावे लागले.
कॅलिफोर्नियाने गेल्या काही वर्षांत भीषण दुष्काळ अनुभवला. या दुष्काळानंतर आता कॅलिफोर्नियावर अतिवृष्टीचं संकट आलंय. प्रचंड पाऊस आणि हिमवृष्टी झाल्यामुळे इथे पूरस्थिती निर्माण झालीय. गेल्या 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ओरोव्हिल धरणाच्या परिसरातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागतंय. ओरोव्हिल शहरातही मुसळधार पावसामुळे अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता. इथल्या 16 हजार लोकांना दुसरीकडे हलवण्यात आलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv