मुंबई, 4 जून : आपल्या समाजात अनेक स्वयंघोषित महिला आणि पुरुष साधू-संत आढळतात. अशातच आता एका महिलेने आपण माता पार्वतीचा अवतार असल्याचं जाहीर करत पार्वतीचा पती महादेवाशी (Bhagwan Shankar) लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ही महिला लखनौची रहिवासी असल्याची माहिती आहे. सध्या ती भारत-चीन सीमेजवळील (Indo-China Border) नाभिधांग या प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे राहत आहे. काय आहे प्रकरण? भारत-चीन सीमेजवळील नाभिधांगच्या प्रतिबंधित भागात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लखनौच्या एका महिलेने ते ठिकाण सोडण्यास नकार दिला आहे. आपण देवी पार्वतीचा अवतार असून, कैलास पर्वतावर राहणार्या भगवान शंकराशी लग्न करणार असल्याचा दावाही तिने केला आहे. दरम्यान, सीमेजवळ बेकायदेशीरपणे राहणाऱ्या या महिलेला हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला निराश होऊन परतावं लागलंय.‘मला इथून परत नेल्यास मी आत्महत्या करेन’ अशी धमकी महिलेनं पोलिसांना दिली होती. ‘झी न्यूज’नं हे वृत्त दिलंय. “हरमिंदर कौर नावाच्या या महिलेला प्रतिबंधित क्षेत्रातून काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाला निराश होऊन परतावं लागले आहे. पोलिसांनी मला इथून परत घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यास मी आत्महत्या करेन, अशी तिने धमकी दिली होती. मात्र, तिला जबरदस्तीने धारचुला येथे आणण्यासाठी आम्ही मोठी टीम पाठवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं या प्रकरणी एनडीटीव्हीशी बोलताना पिथौरागढचे एसपी लोकेंद्र सिंह म्हणाले. “उत्तर प्रदेश येथील अलीगंज भागातील रहिवासी असलेली महिला धारचुलाच्या एसडीएमकडून 15 दिवसांची परवानगी घेऊन आईसोबत गुंजी येथे गेली होती. परंतु 25 मे रोजी तिची परवानगीची मुदत संपल्यानंतरही तिने प्रतिबंधित क्षेत्र सोडण्यास नकार दिला होता. या महिलेला प्रतिबंधित क्षेत्रातून परत आणण्यासाठी दोन उपनिरीक्षक आणि एका निरीक्षकाचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय पोलीस पथकाला धारचूला येथून पाठवण्यात आलं होतं, परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावं लागलं,” असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. Inspiring Story: बिल फोर्ड यांनी केला होता रतन टाटांचा अपमान, टाटांनी ‘या’ पद्धतीनं घेतला बदला! ते पुढे म्हणाले की, “महिलेला परत आणण्यासाठी आम्ही शुक्रवारी वैद्यकीय कर्मचार्यांसह 12 सदस्यीय पोलिसांचं मोठे पथक पाठवण्याची योजना बनवली आहे. ही महिला मानसिकरित्या स्थिर ((Mentally Unstable) नाही, कारण ती देवी पार्वतीचा अवतार असून ती भगवान शंकरांशी लग्न करण्यासाठी आली असल्याचा दावा करत आहे.” गुंजी हे ठिकाण कैलास-मानसरोवरच्या (Kailash Mansarovar) मार्गावर आहे. ही महिला गेल्या काही दिवसांपासून तिथेच आहे. तिला तिथून बाहेर काढणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. तिला परत आणण्यासाठी पोलीस लवकरच मोठं पथक पाठवणार आहेत, त्यावेळी त्यांना यश मिळणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.