अहमदाबाद, 15 फेब्रुवारी: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या तब्येतीबद्दल (CM vijay rupani health update)मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी बडोद्यात एका सभेदरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. व्यासपीठावरच ते कोसळल्याचा VIDEO VIRAL झाला होता. आता रूपाणी यांची (Covid-19 positive) कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना अहमदाबादच्या मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची तब्येत स्थिर असून उपचार सुरू असल्याचं सांगण्यात आलं. रविवारी संध्याकाळी रूपाणी बडोद्याच्या निजामपूर भागात एका चौकात जाहीर सभा घेत होते. त्या व्यासपीठावरच त्यांना चक्कर येऊन ते बेशुद्ध झाले. बाजूच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत मुख्यमंत्र्यांना तातडीने सांभाळलं आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं.
आता मेहता रुग्णालयाच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाणी यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. के. पटेल म्हणाले, “मुख्यमंत्री रुपाणी यांना 24 तास दक्षतेखाली ठेवण्यात येणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही. त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांचे सीटी स्कॅन आणि बाकी रिपोर्ट व्यवस्थित आहेत. " गुजरातमध्ये स्थानिक निवडणुकीच्या प्रचार रॅलीत बोलत असताना विजय रुपाणी यांची शुद्ध हरपली होती.
महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोनाव्हायरने मोठं थैमान घातलं आहे. अजूनही तिथले कोरोना रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत गुजरात मध्ये4400 लोकांचा बळी कोरोनाने घेतला आहे. ज्या बडोद्यात मुख्यमंत्री रूपाणी यांनी सभा घेतली आणि त्या सभेदरम्यानच त्यांची तब्येत ढासळली तिथेही कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे.