सीकर, 20 डिसेंबर: आपल्या भारतीय संस्कृतीत एक लग्न (Marriage) किमान तीन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस चालतं आणि याची तयारी लग्नाच्या कित्येक महिने आधीपासून सुरू करावी लागते. एवढं करुनही आलेल्या पाहुण्यांच्या पाहुणचारात काहींना काही कमी पडतचं. त्यानंतर त्यांचे रुसवे - फुगवे तर वेगळेच असतात. पण या सर्व जांगडगुत्त्यात न अडकता सीकर या ठिकाणी एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सीकर या ठिकाणी झालेलं हे लग्न याबाबतीत अनोखं ठरलं आहे. कारण या लग्नात कसलाही लवजमा, बॅंड बाजा, पाहुणचार, आहेर माहेर असलं काहीही बघायला मिळालं नाही. यावेळी येथे तीन जोडप्यांनी लग्न केली. विशेष म्हणजे ही लग्नं अवघ्या 17 मिनिटांत पार पडली. त्यांनी त्यासाठी नवीन कपडेही खरेदी केली नाहीत. अंगावरच्या कपड्यावरच त्यांनी एकमेकांना हार घातले. यामुळं दोन्ही बाजूंच्या कुटुंबियाचा हजारो रुपयांचा होणारा खर्च वाचला. हे ही वाचा- ऑपरेशनवेळी एक-दोन नाही, पोटातून काढले तब्बल 639 लोखंडी खिळे; डॉक्टरही हैराण सीकर शहरातील कल्याण स्कुलच्या मैदानावर एक सत्संग भरलं होतं. या सत्संग समारंभातच ही तीनही लग्न पार पडली. त्यामुळं उपस्थितांना हा अनोखा नजारा पाहायला मिळाला. या लग्नात ना बॅंडबाजा होता, ना घोडी, कसली सजावटही केली नव्हती, हुंड्याची बातही नाही झाली. त्यामुळं या लग्नांनी पारंपरिक चौकटीच्या सर्व सीमा ओलांडल्या आणि एक वेगळा आदर्श निर्माण केला. शिवाय या लग्नाच्या ठिकाणी एका भव्य रक्तदान शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं. या जोडप्यांनी प्रत्येकी 90 युनिट रक्तदान करत समाजापुढं एक नवा आदर्श निर्माण केला. उपस्थितांनी त्यांच कौतुक केलं आणि त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी अनेक आशीर्वादही दिले.