JOIN US
मराठी बातम्या / देश / कामगारांसाठी कधीपासून सुरू होणार 4 दिवसांचा आठवडा? केंद्रीय मंत्र्यांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

कामगारांसाठी कधीपासून सुरू होणार 4 दिवसांचा आठवडा? केंद्रीय मंत्र्यांनी दिलं महत्त्वाचं अपडेट

या कायद्यामुळे (New Wage Code) नोकरदारांच्या पगार, सुट्ट्या, पीएफ, कामाचे तास या सर्व गोष्टींमध्ये बदल होतील.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 जुलै : केंद्र सरकारचा नवीन वेज कोड (New Wage Code) म्हणजेच कामगार कायदा 1 जुलै 22 पासून लागू होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती; पण काही कारणास्तव तो लागू करण्यात आला नाही. या कायद्यामुळे नोकरदारांच्या पगार, सुट्ट्या, पीएफ, कामाचे तास या सर्व गोष्टींमध्ये बदल होतील. तसंच चार दिवसांचा आठवडा व तीन दिवस सुट्टी हा महत्त्वाचा बदल या कायद्यामुळे होणार आहे. हा कायदा कधी लागू होईल, याबद्दल कामगार राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. रामेश्वर तेली यांनी लोकसभेत लेखी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, नवीन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही डेडलाईन निश्चित केलेली नाही. रामेश्वर तेली म्हणाले की, बहुसंख्य राज्यांनी चार लेबर कोडवरील मसुदा केंद्राकडे पाठवला आहे. नवीन कामगार संहिता 1 जुलैपासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु काही राज्यांकडून कोडमधील ड्राफ्ट कमेंट्स येणे बाकी आहे. आतापर्यंत, एकूण 31 राज्यांनी नवीन वेज कोडवर ड्राफ्ट नियम पाठवले आहेत. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. चार कोड कोणते ? नवीन लेबर कोड वेज (Wage), सोशल सिक्युरिटी (Social Security), इंडस्ट्रीयल रिलेशन्स (Industrial Relations) आणि ऑक्युपेशनल सेफ्टी (Occupational Safety) यांच्याशी संबंधित आहेत. या लेबर कोडमुळे पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. नवीन कोड लागू झाल्यानंतर, साप्ताहिक सुट्ट्यांपासून ते हातात येणाऱ्या पगारातही बदल होईल. सर्व राज्यांकडून ड्राफ्ट्स येणं बाकी 25 राज्यांनी इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोडवर (Industrial Relations code) त्यांचे ड्राफ्ट्स केंद्राकडे पाठवले आहेत. तर, ऑक्युपेशनल सेफ्टीशी (Occupational Safety) संबंधित ड्राफ्ट्स 24 राज्यांनी केंद्राकडे पाठवले आहेत. सर्व चार कोड्समध्ये (4 Labour codes) राज्यांकडून ड्राफ्ट्स केंद्राकडे पाठवणं बाकी आहे. सर्व राज्यांनी एकाच वेळी हा कोड लागू करावा, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. कधीपासून होणार लागू ? सध्या अनेक राज्यांमध्ये वेगवेगळे कोड्स आहेत. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन वेज कोड 1 ऑक्टोबर 22 पासून लागू केला जाऊ शकतो. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. राजस्थान (Rajasthan) आणि मिझोरामने फक्त एकेका कोडसाठी ड्राफ्ट पाठवला आहे. तर, पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे, ज्यांनी कोणत्याच कोडवर ड्राफ्ट दिलेला नाही. काय बदल होणार ? नवीन वेज कोडमध्ये मूळ वेतनातही (Basic Salary) बदल करण्याची तरतूद आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर, टेक होम सॅलरी म्हणजेच इन-हँड पगार तुमच्या खात्यात कमी जमा होईल. सरकारने पे रोलबाबत नवीन नियम केले आहेत. नवीन वेज कोडनुसार, कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी त्याच्या एकूण पगाराच्या (CTC) 50 टक्के किंवा त्याहून अधिक असावी. मूळ वेतनात वाढ झाल्यामुळे तुमच्या पीएफमध्ये अधिक पैसे जमा होतील. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी तुम्हाला मोठी रक्कम मिळू शकेल. या कायद्यानुसार, पगारदारांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याचा आणि तीन दिवस सुट्टीचा पर्याय आहे. आठवड्यातून तीन दिवस सुट्टीचा पर्याय घेणार्‍या लोकांना दररोज ऑफिसमध्ये 12 तास काम करावं लागेल. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला आठवड्यातून 48 तास काम करावं लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या