लखनऊ, 11 जुलै : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊमध्ये दहशतवाद विरोधी पथकानं (UP ATS) दोन संशयित दहशतवाद्यांना (Suspect terrorist) अटक केली आहे. या दोघांचे अल्-कायदा (Al-Qaeda) या दहशतवादी संघटनेशी (Terrorist organization) संबंध असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रेशर-कुकर बॉम्ब (Pressure cooker bomb) जप्त करण्यात आला असून इतरही अनेक शस्त्रास्त्रं (Weapons) पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यासोबत काही कागदपत्रंही पोलिसांना मिळाली असून या दोघांच्या इतरही काही साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. अशी झाली कारवाई उत्तर प्रदेशमधील काकोरी भागात काही दहशतवादी लपले असून ते काहीतरी भयंकर योजना आखत असल्याची माहिती उत्तर प्रदेश एटीएसला मिळाली. मग एटीएसनं मोठ्या फौजफाट्यासह काकोरीमध्ये छापा मारून दोन संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतलं. त्यातील एकाचं नाव शाहिद असल्याची माहिती असून दुसऱ्याचा तपास सुरू आहे. मूळचा मलिहाबादचा असणारा शाहिद काकोरीमध्ये स्वतःच्या मालकीच्या घरात सहकुटुंब राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गॅरेजचा व्यवसाय करणाऱ्या शाहीदच्या घरातून प्रेशर कुकर बॉम्ब पोलिसांना मिळाला. या बॉम्बसोबत अर्धवट अवस्थेतील एक टाईम बॉम्बही पोलिसांनी जप्त केला. शाहिदच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत असून लवकरच एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत हे सगळे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आता या कारवाईमुळे दहशतवाद्यांचा हा संभाव्य प्लॅन फसल्याचं सांगितलं जात आहे. हे वाचा - सर्वांना मान्य आहे मग अडलं कुठे? मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचा रोखठोक सवाल ‘अल्-कायदा’चं युपी कनेक्शन अल्-कायदा या दहशतवादी संघटनेनं 2014 साली इंडिया सबकॉन्टिनंट या मोहिमेची घोषणा केली होती. या योजनेचा प्रमुख उत्तर प्रदेशातून काम करत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. मौलाना उमीम उमर असं त्याचं नाव असल्याचंही समजलं होत. मात्र त्यानंतर उमर भारतातून पाकिस्तानमध्ये गेल्याचं स्पष्ट झालं. तिथून पुढे तो अफगाणिस्तानमध्ये गेला आणि एका कारवाईत मारला गेल्याची माहितीही पुढं आली होती. त्यानंतर स्लीपर सेलच्या माध्यमातून अल्-कायदाचं काम सुरू असल्याची माहिती आहे.