स्टॅच्यु ऑफ युनिटी बघायला देशभरातून नव्हे तर जगभरातून लोक येणार असल्यानं या ठिकाणी सुविधा कशाप्रकारे असणार आहेत जाणून घेऊया.
सरदार पटेल यांचा पुतळा जगातला सर्वांत उंच पुतळा झाला आहे. १८२ मीटर उंचीचा हा स्टॅच्यु ऑफ युनिटी अमेरिकेच्या प्रसिद्ध स्टॅच्यु ऑफ लिबर्टीपेक्षा दुप्पट उंच आहे. चीनमध्ये स्प्रिंग टेंपलमधली बुद्धाची मूर्ती १५३ मीटर उंच आहे. हा आतापर्यंतचा जगातली सर्वांत उंच पुतळा होता. आता सरदार पटेलांचा पुतळा सर्वांत उंच पुतळा आहे.
स्टॅच्यु ऑफ युनिटी बघायला देशभरातून नव्हे तर जगभरातून लोक येणार हे लक्षात घेऊन पर्यटकांच्या सोयीसाठी खास ट्रेन चालवली जाणार आहे. युनिटी एक्स्प्रेस राजकोटहून सलग १२ दिवस असेल. दररोज किमान १५००० पर्यटक या पुतळ्याला भेट द्यायला येतील असा गुजरात सरकारचा अंदाज आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी इथे लिफ्टची सोयही करण्यात आली आहे. एका वेळी २०० लोक बसू शकतील एवढी मोठी ही लिफ्ट आहे.
या पुतळ्यापासून ३ किलोमीटर अंतरावर एक टेंट सिटी बनवण्यात येणार आहे. हे पर्यटकांसाठी उभारलेलं गाव असेल. इथून पुतळा व्यवस्थित दिसू शकेल.
प्रत्यक्ष पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी नावेचा वापर करावा लागणार आहे. या पुतळ्याच्या दर्शनासाठी ३५० रुपयांचं तिकिट काढावं लागेल, असं काही माध्यमांचं वृत्त आहे. भविष्यात ऑनलाईन तिकिटांची सोयही करण्यात येईल. पुतळा दुरूनसुद्धा बघता यावा यासाठी एका ठरावीक लोकेशनवर भारत भवन नावानं पर्यटक निवास बनवण्यात आला आहे. खास या पुतळ्याच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे राहायची सोय होऊ शकते. ५२ खोल्यांची इथे व्यवस्था आहे.
पुतळ्याच्या १३५ मीटरच्या उंचीवर प्रेक्षकांसाठी एक गॅलरी बनवण्यात आली आहे. यावरून नर्मदेचं आणि बाजूच्या पर्वतराजीचं विहंगम दृश्य पाहता येईल.
स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या निमित्ताने नर्मदा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी फुलों की घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यात आलंय. शिवाय नर्मदेत बोटिंगची सोयसुद्धा करण्यात आली आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा उत्तुंग पुतळा उभा कऱण्याची कल्पना गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली होती. तो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. २०१०मध्ये गुजराजचे मुख्यमंत्री असताना त्यांनी या पुतळ्याची पायाभरणी केली होती.
स्टॅच्यु ऑफ युनिटी - अर्थात एकात्मतेचा पुतळा म्हणून उभारलेली ही प्रतिमा १८२ मीटर उंच आहे. यासाठी २९९० कोटी रुपये खर्च आला आहे. १ लाख ४० हजार क्युबिक मीटर काँक्रिट या पुतळ्याच्या उभारणीसाठी लागलंय. शिवाय २००० टन ब्राँझ आणि १८५०० टन लोखंडी रॉड्स या कामासाठी वापरले आहेत. ३००० मजूर सलग ३३ महिने या प्रकल्पासाठी राबत होते.
स्टॅच्यु ऑफ युनिटीचा पाया बराच मजबूत असल्याचा दावा केला जातोय. ताशी २२० किमी वेगानं वाहणारे वारे किंवा चक्रिवादळ आलं तरीही या पुतळ्याला धक्का लागणार नाही. शिवाय ६.५ रिश्टर स्केलएवढा भूकंपाचा धक्काही पुतळ्याला हलवू शकणार नाही, असं सांगितलं जातंय.
दिल्लीजवळच्या नोएडा इथले शिल्पकार राम सुतार यांच्या नेतृत्वाखाली या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. सुतार यांना पद्मविभूषण देऊन आगीच सन्मानित करण्यात आलं आहे. ९०च्या पुढे वय असणाऱ्या सुतार यांनी २०००हून अधिक प्रतिमांचा बारकाईनं अभ्यास करून स्टॅच्यु ऑफ युनिटीचा आराखडा तयार केला. अनेक इतिहासकारांनाही सुतार यासाठी भेटले.
या पुतळ्याच्या मुख्य कामासाठी ४ धातूंचा वापर करण्यात आलाय. ८० टक्के तांबं वापरलं गेलंय, असंही सांगण्यात येतंय. स्टॅच्यु ऑफ युनिटी प्रकल्पाचं काम लार्सन अँड टूब्रो या इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आलं होतं. ५७०० मेट्रिक टन स्टीलचा वापर यात करण्यात आला आहे.