भारतात 100 कोटी नागरिकांच्या लसीकऱणाचा टप्पा पार पडला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं ही घटना साजरी केली जात असून स्पाईस जेट या विमान कंपनीनं आपल्या विमानांवर अनोखे फोटो लावत हा क्षण साजरा केला. देशातील 75 टक्के ज्येष्ठ नागरिकांना तर कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. दर एकूण लोकसंख्येच्या 31 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.
देशात 100 कोटींचं लसीकरण झाल्यानंतर प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं हा क्षण साजरा करत आहे. देशात जणू एखादा सण साजरा व्हावा, असं वातावरण आहे. भारतातील विमान कंपनी स्पाईसजेटनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
स्पाईसजेटनं आपल्या विमानांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर यांचे फोटो झळकावले. ‘कोरोना हारेगा, देश जितेगा’, असा संदेशही त्यातून देण्यात आला.
ANI ने प्रसिद्ध केलेल्या फोटोनुसार स्पाईसजेटनं देशाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. भारत कोरोनाच्या लसीप्रति किती जागरूक आहे, हे दाखवण्याचा प्रयत्नही यातून करण्यात आला आहे.
स्पाईसजेटचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी भारतातील सर्व विमान कंपन्यांचे आभार मानले आहेत. स्पाईसजेटसोबत देशातील तमाम विमान कंपन्यांनी लसी पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. कोरोनाला पराभूत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.