JOIN US
मराठी बातम्या / देश / काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत  

काँग्रेसच्या या दिग्गज नेत्याने दिले राजकारणातून संन्यास घेण्याचे संकेत  

मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्क्यामागून धक्के बसत आहेत. पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ 14 डिसेंबर: मध्य प्रदेशात काँग्रेसला (Madhya Pradesh Congress) धक्क्यामागून धक्के बसत आहेत. पोटनिवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिले आहेत. मला आता कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही, सर्व काही मिळालं आहे. त्यामुळे आता घरी बसून आराम करण्याची इच्छा असल्याचं वक्तव्य कमलनाथ यांनी छिंदवाड्यात एका सभेत बोलताना दिलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून नंतर कमलनाथ यांना तसे म्हणायचे नव्हते अशी सारवासारव त्यांच्या वतीने करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून पक्षात सक्रिय असलेले कमलनाथ हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ समजले जातात. केंद्रात दीर्घकाळ त्यांनी मंत्रिपद सांभाळलं होतं. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यात त्यांना यश मिळालं आणि मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. मात्र ते सरकार काठावर असलेल्या बहुमताचं असल्याने भाजपने धक्का देत सरकार खाली खेचलं. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी अत्यंत सुमार राहिली होती त्यामुळे कमलनाथ यांच्या विरुद्ध नाराजीही व्यक्त केली जात होती. पक्षांतर्गत मतभेदांना कंटाळून तरुण नेते जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. कमलनाथ हे त्यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या छिंदवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं होतं. नंतर त्यावरून चर्चा सुरू झाल्याने कलनाथ यांचे माध्यम समन्वयक नरेंद्र सलूजा यांनी स्पष्टिकरण देताना सांगितलं की, मध्य प्रदेशातल्या जनतेची इच्छा असेपर्यंत राजकारणात राहणार असल्याचं कमलनाथ यांनी म्हटलं आहे. राजकारणात राहूनच ते जनतेची यापुढेही सेवा करतील असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

तर 2023च्या विधानसभेच्या निवडणुका या कमलनाथ यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचं राज्य काँग्रेसतर्फे सांगण्यात आलंय. या सगळ्या चर्चेत भाजपने कमलनाथ यांना टोला हाणलाय. कमलनाथ यांनी हाच निर्णय आधी घेतला असता तर मध्य प्रदेश येवढा मागे गेला नसता असं भाजपने म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या