JOIN US
मराठी बातम्या / देश / अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलाच्या तब्बल 350 तुकड्या तैनात; दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सज्ज

अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलाच्या तब्बल 350 तुकड्या तैनात; दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी सज्ज

सुरक्षा व्यवस्था नीट राबवली जावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या झोन आणि सेक्टरमध्ये विभागलं आहे. प्रत्येक झोनमध्ये एसपी रँकचे अधिकारी तैनात आहेत. तर, सेक्टरमध्ये डीएसपी रँकचे तीन ते चार ऑफिसर तैनात आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 जून : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्थगित असलेली अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra) या वर्षी होणार आहे. या यात्रेसाठी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra 2022) पार पडत आहे. 43 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये कोणताही घातपात होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने सुरक्षा दलांच्या तब्बल 350 तुकड्या या ठिकाणी तैनात केल्या आहेत. दैनिक भास्कर ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. दोन सर्वांत मोठे धोके काश्मीरचे आयजी विजय कुमार (Kashmir IG Vijay Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी अमरनाथ यात्रेवर स्टिकी बॉम्ब आणि ड्रोन हल्ला या दोन प्रकारचे हल्ले होण्याचा धोका आहे. स्टिकी बॉम्ब (Sticky Bomb) हे अगदी छोट्या आकाराचे बॉम्ब असतात, जे काही सेकंदांत गाडी किंवा बसच्या खाली चिकटवता येतात. त्यानंतर रिमोटच्या मदतीने यांचा ब्लास्ट करता येतो. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून असं समजलं आहे, की काश्मीरमधील स्थानिक दहशतवाद्यांकडे अशा प्रकारचे बॉम्ब आहेत. सोबतच, गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून देशात हत्यारांच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर वाढला आहे. या ड्रोनवरच पेलोड फिट (Drone Attack in Amarnath Yatra) करून हवाई हल्ला करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष म्हणजे दहशतवादी सीमेपलीकडे बसूनही असे हल्ले करू शकतात. त्यामुळे ड्रोन हल्ल्यांचा धोका गंभीर आहे. “अमरनाथ यात्रेमध्ये स्टिकी बॉम्ब आणि ड्रोनच्या मदतीने हल्ले केले जाऊ शकतात, अशी माहिती पकडल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून मिळाली होती. या दोन्ही हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी संपूर्ण प्लॅन तयार आहे. ड्रोन हल्ल्यांना हवेतल्या हवेत उत्तर दिलं जाईल” असं विजय कुमार यांनी स्पष्ट केलं. भारतील लष्कर आणि सैन्यदलं आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिक वापर करत आहेत. काश्मीरातील दहशतवाद्यांशी लढताना त्यांना चांगली अद्ययावत उपकरणं मिळाली आहेत त्यामुळे त्यांचं बळ वाढलं आहे. यंदा 8 लाख भाविक येण्याची शक्यता या वर्षी 30 जून ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये ही यात्रा (Amarnath Yatra dates) पार पडेल. अमरनाथजी श्राईन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 3 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. गेली दोन वर्षं ही यात्रा न झाल्यामुळे, या वर्षी भाविकांची संख्या 8 लाखांपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. 2013 साली या यात्रेमध्ये 3 लाख 53 हजार भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर 2014 साली 3.72 लाख, 2015 साली 3.52 लाख, 2016 साली 2.20 लाख, 2017 साली 2.60 लाख, 2018 साली 2.85 लाख आणि 2019 साली 3.42 लाख भाविक अमरनाथ यात्रेत सहभागी झाले होते. बाबा अमरनाथ हे हिंदू देवता शिवशंकरांचं महत्त्वाचं स्थान आहे. जगभरातील हिंदू या ठिकाणी नैसर्गिकरित्या दरवर्षी निर्माण होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी अमरनाथ यात्रेत सहभागी होतात. अमरनाथच्या गुहेत हे शिवलिंग आकार घेतं. त्यामुळेच शिवशंकरांना बाबा अमरनाथ सोबतच बाबा बर्फानी असंही म्हटलं जातं. या यात्रेमुळे स्थानिक नागरिकांचं अर्थकारण गतिमान व्हायला मदत होते. यात्रेसाठी दोन रस्ते जम्मू काश्मीर बेस कॅम्पपासून दोन मार्गांनी (Amarnath Yatra route) अमरनाथच्या पवित्र गुहेपर्यंत पोहोचता येतं. पहिला रस्ता हा पहलगाममार्गे आहे. या मार्गाने गेल्यास एकूण 46 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हा एकूण प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात. दुसरा रस्ता हा बालटालमार्गे आहे. हा अवघ्या 14 किलोमीटरचा मार्ग असला, तरी या मार्गात पाऊस आणि हिमवर्षाव होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे बहुतांश भाविक पहलगाम मार्गच निवडतात. दोन्ही रस्त्यांवर सुरक्षिततेचा चोख बंदोबस्त असतो. केंद्राच्या तुकड्या तैनात या सर्व धोक्यांना तोंड देण्यासाठी आपण सज्ज (Safety Precautions in Amarnath Yatra) असल्याची माहिती विजय कुमार यांनी दिली. या वर्षी पहिल्यांदाच अमरनाथ यात्रेमध्ये केंद्राच्या तब्बल 350 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सीएपीएफच्या (CAPF) 40 हजारांहून अधिक जवानांचा समावेश आहे. या यात्रेमध्ये तीन स्तरांची सुरक्षा व्यवस्था (Three level safety in Amarnath Yatra) तैनात असणार आहे. रोड ओपनिंग पार्टीसाठी सीएपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस संयुक्तपणे तयारी करतील. डोंगराळ भाग आणि जंगलांमध्ये लष्कर तैनात असेल. यात्रेवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन्स, सीसीटीव्ही यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच, आवश्यक ठिकाणी शार्प शूटर्स आणि स्नायपर्सदेखील तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच NDRF, UTSDRF आणि MRT दलांनाही ठिकठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. ड्रोन आणि बॉम्बपासून अशी सुरक्षा सीमेपलीकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लखनपूर ते जम्मू अँटी इन्फिल्ट्रेशन ग्रिड (Amarnath Yatra Security Grid) तैनात केलं आहे. यात्रेकरूंना आणि त्यांच्या गाड्यांना सुरक्षा देण्यासाठी जम्मू ते बनिहाल टनलपर्यंत रोड ओपनिंग पार्टी आणि कॉन्व्हॉय ग्रिड तैनात करण्यात आलं आहे. ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी अँटी ड्रोन ग्रिड तयार करण्यात आलं आहे. हे ग्रिड आकाशातील सर्व गोष्टींवर लक्ष ठेवेल. तसंच कोणत्याही संशयित ड्रोनला काउंटर करण्याचं काम हे ग्रिड करेल. ट्रान्सपोर्टेशन विभागातील लोकांना, म्हणजेच ड्रायव्हर किंवा कंडक्टर यांना विशेष ट्रेनिंग देण्यात येत आहे. या लोकांना यात्रेमध्ये गाडीची देखरेख कशी करावी, स्टिकी बॉम्ब काय आहे आणि त्याबाबत कशी खबरदारी घ्यावी याबाबत माहिती देण्यात येत आहे. सोबतच गाड्यांच्या जवळपास फिरकणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सामान्य नागरिक सतर्क राहिले आणि त्यांच्या निदर्शनास आलेल्या गोष्टी त्यांनी सुरक्षा दलांना सांगितल्या तरीही खूप मोठी मदत होऊ शकते आणि धोका टाळला जाऊ शकतो म्हणून ही व्यवस्था केली आहे. कोणाकडे काय जबाबदारी सुरक्षा दलांमध्ये सीआरपीएफ (CRPF) जवानांची संख्या सर्वाधिक असणार आहे. हे जवान यात्रेकरूंसोबतच असतील. बेस कॅम्पपासून पायी रस्त्याची सुरक्षा ते पाहतील. जंगलात आणि डोंगरांवर लष्कर तैनात असेल. बीएसएफ जवान हे प्रामुख्याने सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीवर लक्ष ठेवतील. तसंच, ते सीआरपीएफ जवानांसोबत यात्रेकरुंसोबतही असतील. यात्रा मार्गाची सुरक्षा करण्याची जबाबदारी आयटीबीपी आणि एसएसबी जवानांची असणार आहे. या सर्वांचा समन्वय राखणं आणि सिक्युरिटी प्लॅन फायनल करणं याची जबाबदारी जम्मू-काश्मीर पोलिसांवर असणार आहे. सुरक्षा व्यवस्था नीट राबवली जावी यासाठी प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळ्या झोन आणि सेक्टरमध्ये विभागलं आहे. प्रत्येक झोनमध्ये एसपी रँकचे अधिकारी तैनात आहेत. तर, सेक्टरमध्ये डीएसपी रँकचे तीन ते चार ऑफिसर तैनात आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीसाठी क्विक रिस्पॉन्स टीमदेखील तयार करण्यात आल्या आहेत. यात्रेकरूंच्या कॅम्पची जबाबदारी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडे आहे. रोड ओपनिंग पार्टी (ROP) आणि क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) ही जबाबदारी सीआरपीएफ आणि लष्कराकडे आहे. लंगर, लोकल कॅम्प आणि कायदा व सुव्यवस्था याची जबाबदारी सीआयएसएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडे आहे. तसंच, एरिया डॉमिनेशन आणि हाय अल्टिट्यूड सर्व्हिलियन्सची जबाबदारी लष्कर आणि बीएसएफ जवानांकडे आहे. पहलगाम किंवा बालटालनंतर खरे आव्हान जम्मू-काश्मीरचे माजी डीजीपी (Jammu Kashmir Ex DGP) ए. पी. वेद यांनी सांगितले, की अमरनाथ यात्रेकरू पहिल्यांदा जम्मूच्या बेस कॅम्पमध्ये थांबतात. इथूनच सुरक्षा व्यवस्था सुरू होते. त्यानंतर यात्रेकरू पहलगाम किंवा बालटालच्या बेस कॅम्पवर पोहोचतात. जिथून खरी यात्रा सुरू होते. या दोन पॉइंट्सनंतर खरे आव्हान सुरू होते. या डोंगराळ भागात अधिक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची गरज असते. या ठिकाणी हल्ले झालेले आपण पूर्वी पाहिले आहेत. “वेगवेगळ्या सुरक्षा दलांच्या तुकड्या प्रत्येक जिल्ह्याच्या एसएसपीकडे तैनात करण्याची जबाबदारी राज्याच्या डीजीपींची असते. रोड ऑपरेटिंग पार्टीमध्ये लष्कर, सीआरपीएफ आणि बीएसएफ जवानांची भूमिका महत्त्वाची ठरते. तर, जनरल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनची जबाबदारी जम्मू-काश्मीर पोलिसांची असते.”, असे वेद यांनी स्पष्ट केले. 2019 नंतर दहशतवादी हल्ले कमी झाले आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट 2019 नंतर जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांवर आणि सुरक्षा दलांवर होत असलेल्या हल्ल्यांची संख्या कमी झाली आहे. कलम 370 हटवल्यानंतर आतापर्यंत काश्मीरमध्ये 500 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांसाठी काम करणाऱ्या शेकडो नागरिकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. रस्त्यांवर होणारी हिंसा आणि दगडफेक आता बंद झाली आहे. पोलीस किंवा सुरक्षा दलांच्या गोळीबारात एकाही सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला नाही. दहशतवाद्यांचा मृतदेह आता कुटुंबीयांना दिला जात नाही, त्यामुळे त्यांची अंत्ययात्रा काढून त्यांना ग्लॅमराईज करण्याचे प्रकार थांबले आहेत. या वर्षी आतापर्यंत दहशतवाद्यांकडून 13 काश्मीरी मुस्लिम आणि 6 हिंदूची हत्या करण्यात आली आहे. तर, सुरक्षा दलांनी या वर्षात 120 दहशतवाद्यांना ठार केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या