दिल्ली, 9 फेब्रुवारी : मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये रॉबर्ट वाड्रा यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा काही थांबताना दिसत नाही. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये आठवड्यामध्ये रॉबर्ट वाड्रा यांची तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी देखील रॉबर्ट वाड्रा यांची ब्रिटनमधील मालमत्ता खरेदी संदर्भात चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, आज भारतातील संपत्ती विषयी चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वी देखील रॉबर्ट वाड्रा यांची बुधवार आणि गुरूवारी चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये अटकेपासून दिलासा मिळावा याकरता वाड्रा यांनी पटियाला कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे. पण, याकाळात ईडीला सहकार्य करण्याचे आदेश देखील न्यायालयानं दिले आहेत. ‘राजकारण होतंय’ विरोधकांना नामोहराम करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणांचा वापर करत आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या चौकशीचा फार्स हा त्याचाच एक भाग असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, मी माझ्या कुटुंबाच्या पाठिशी ठामपणे उभे आहे असं प्रियांका गांधी यांनी स्पष्ट केलं आहे. नुकताच प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. काय आहे मनी लाँड्रिंग प्रकरण? मनी लाँडरिंगचं प्रकरण लंडनमधील मालमत्तेच्या खरेदीशी संबंधित आहे. लंडनमधील ‘ब्रायनस्टन स्क्वेअर’ येथे 17 कोटी रूपयांचा प्लॅट रॉबर्ट वाड्रा यांनी खरेदी केला होता. फ्लॅट विकत घेताना मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आहे. शिवाय, हा फ्लॅट देखील वाड्रा यांच्या मालकीचा असल्याचा ईडीचा दावा आहे.