07 ऑगस्ट : रक्षाबंधन म्हणजे भावा बहिणीच्या अतूट नात्याचा सण. अनेक बहिणी आपल्या सख्ख्या, नात्यातल्या किंवा मानलेल्या भावांना या दिवशी राखी बांधतात. पण एक बहीण अशीही आहे जी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या 23 वर्षांपासून राखी बांधते आहे. पाकिस्तानात जन्मलेली क्वामार मोहसीन शेख गेले 23 वर्ष मोदींना राखी बांधते आहे आणि यावर्षीही राखी बांधण्याच्या तयारीत आहे. क्वामार लग्नानंतर भारतात आली. तिचं माहेर पाकिस्तानातच आहे. तिला घरची खूप आठवण पण येते. पण ती स्वत:ला भारतीयच मानते. 23 वर्षांपूर्वी मोदी संघाचे कार्यकर्ते असताना तिची आणि मोदींची भेट झाली. त्याच संदर्भात क्वामार आणि मोदींची भेट व्हायची. ‘एकदा रक्षाबंधनला मी मोदींना राखी बांधू का असं विचारलं. त्यांनी आनंदाने त्यांचा हात पुढे केला आणि मी राखी बांधली’.
तेव्हापासून दरवर्षी शेख त्यांना राखी बांधते आहे. यावर्षी मोदी व्यस्त असतील शेख यांना वाटलं होतं. पण दोन दिवसांपूर्वीच मोदींचा फोन आल्याचंही त्यांनी सांगितलं. ‘आपल्या कष्टांनी आणि दूरदृष्टीमुळेच मोदी पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले आहेत’ असं म्हणत त्यांनी मोदींची प्रशंसाही केली.