नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधींनी माझं म्हणणं ऐकलं. राजस्थानमध्ये जो घटनाक्रम झाला त्यावर आम्हा दोघांमध्ये चर्चा झाली, असं सचिन पायलट यांनी सांगितलं. राजस्थानचा मुख्यमंत्री कोण असेल, यावर उत्तर देताना मी माझी भावना काँग्रेस अध्यक्षांपर्यंत पोहोचवली आहे, आता त्याच याबाबतचा निर्णय घेतील, असं सचिन पायलट म्हणाले. मेहनत करून 2023 ची निवडणूक जिंकावी, हीच माझी अपेक्षा आहे. यासाठी सगळ्यांना मिळून लढावं लागेल. राजस्थानबाबतचा निर्णय काँग्रेस पक्ष घेईल. राजस्थानसह इतर राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार कसं बनेल, हाच आमचा उद्देश आहे, अशी प्रतिक्रियाही सचिन पायलट यांनी दिली. अशोक गेहलोतही दिल्लीत दरम्यान राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. साधारण दीड तास ही बैठक चालली. आमदाराच्या त्या बैठकीनंतर अनेकांना धक्का बसला होता. सर्वांना वाटत होतं की, मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. या सर्व प्रकरणानंतर मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे, असं विधान अशोक गेहलोत यांनी केलं. मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय सोनिया गांधी घेतील. मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. याशिवाय ते काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. ते जेव्हा सोनिया गांधींना भेटायला गेले, तेव्हा त्यांच्या हातात माफीनामा असल्याचंही सांगितलं जात आहे.