नवी दिल्ली 03 ऑक्टोबर: काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना अखेर उत्तर प्रदेश सरकारने हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे. निवडक नेत्यांसोबते पीडित कुटुंबीयांची ते भेट घेतील. दिल्लीतून दुपारी राहुल आणि प्रियंका गांधी उत्तर प्रदेशकडे निघाले होते. प्रियंका या स्वत: ड्रायव्हिंग करत निघाल्या होत्या. उत्तर प्रदेश सीमेवर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता. त्यांना पांगविण्यासाठी पोलीस बळचा वापर करत होते. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांची धक्काबुक्कीही झाली. ती धक्काबुक्की होत असताना प्रियंका गांधी यांचं लक्ष कार्यकर्त्यांकडे गेलं. पोलीस त्यांना रेटत असल्याचं पाहून त्या वेगाने पुढे आल्यात आणि बॅरेकेट्स ओलांडत त्यांनी कार्यकर्त्यांचा बचाव केला. दोन दिवसांपूर्वी राहुल गांधीही पोलिसांच्या रेट्यात खाली कोसळले होते.
हाथरसकडे जात असताना ते मथुरेजवळ एका हॉटेलमध्येही थांबले होते. तिथे त्यांनी काही काळ थांबत नंतर पुढचा प्रवास केला. या प्रकरणावरून पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सर्व गावाची पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर माध्यमांना गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांनी ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हतीच असा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या प्रकरणात राज्य सरकारने SITचं गठण केलं असून ते तपास करत आहेत. मात्र या किंवा CBI चौकशीवर आमचा विश्वास नाही असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले.