नवी दिल्ली, 22 जुलै : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) 24 जुलैला निवृत्त होणार आहेत. त्यानंतर द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मुर्मू यांनी यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव केला. निवृत्त होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. 23 जुलैला दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. राष्ट्रपती असताना रामनाथ कोविंद यांना वेगवेगळ्या सुविधा मिळत होत्या, यामध्ये महिन्याला 5 लाख रुपये पगार, मोफत वैद्यकीय सुविधा, राहणं आणि प्रवास यांचा यामध्ये समावेश होता. निवृत्तीनंतरही कोविंद यांना यातल्या बऱ्याच सुविधा कायम राहणार आहेत. बंगला निवृत्तीनंतर रामनाथ कोविंद 12 जनपथ इकडे राहतील. ल्युटिन्स दिल्लीमधला हा सगळ्यात मोठ्या बंगल्यापैकी एक आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या बंगल्यासमोरच हा बंगला आहे. 25 जुलैला कोविंद या बंगल्यामध्ये राहायला जातील, असं सांगितलं जात आहे. रामनाथ कोविंद यांचा बंगला टाईप-8 असून यात 7 खोल्या आणि कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळी खोली आहे. माजी केंद्रीय मंत्री राम विलास पासवान निधन होईपर्यंत या बंगल्यामध्ये राहत होते. यानंतर पासवान यांचा मुलगा चिराग पासवान तिकडे राहायचा, पण मार्च 2022 साली कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर चिराग पासवान यांना तो बंगला सोडावा लागला. यानंतर हा बंगला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनि वैष्णव यांना देण्यात आला, पण ते इकडे राहायला गेले नाहीत. पेन्शन राष्ट्रपती पेन्शन कायद्यानुसार रामनाथ कोविंद यांना महिन्याला 1.5 लाख रुपये पेन्शन मिळेल. याआधी 2008 पर्यंत निवृत्त राष्ट्रपतींना 50 हजार रुपये पेन्शन दिली जायची, पण 2008 साली या कायद्यात सुधारणा करून रक्कम वाढवण्यात आली. इतर सुविधा रामनाथ कोविंदा यांना याशिवाय दोन लँडलाईन फोन, एक मोबाईल फोन, इंटरनेट कनेक्शन, मोफत वीज आणि पाणी या सुविधाही दिल्या जातील. सोबतच एक कार आणि ड्रायव्हरही त्यांची सेवा करण्यासाठी असेल. याशिवाय त्यांना दोन सेक्रेटरी आणि दिल्ली पोलिसांची सुरक्षा असेल. निवृत्त झाल्यानंतरही रामनाथ कोविंद यांना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात येतील. तसंच त्यांना प्रवासासाठी रेल्वेचं प्रथम श्रेणीचं आणि विमानाचं मोफत तिकीट आयुष्यभर दिलं जाईल.