नवी दिल्ली, 6 जानेवारी : सध्या दिल्लीतल्या कांझवाला इथलं ‘हिट अँड रन’ प्रकरण देशभरात चर्चेचा विषय आहे. एका ग्रे बलेनो कारने 20 वर्षीय अंजलीला सुलतानपुरी इथे धडक देऊन कांझवालापर्यंत फरपटत नेलं होतं. हे अंतर 12 किलोमीटर इतकं होतं. या घटनेत अंजलीचा मृत्यू झाला. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मृत अंजलीच्या मैत्रीण निधीला पोलिसांनी बोलावले आहे. घटनेच्या वेळी अंजलीसोबत असलेली तिची मैत्रीण निधी हिने स्कूटीवरून पडल्यानंतर ‘भीती’मुळे घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्कॅन केल्यानंतर हा निधीचा माहिती समोर आली. मंगळवारी तिने पोलिसांसमोर जबाब नोंदवला. दिल्लीचे पोलीस आयुक्त (बाह्य) हरेंद्र कुमार सिंग म्हणाले, “निधीला पोलिसांनी अटक केल्याच्या चर्चा होत आहेत. मात्र, तिला फक्त तपासात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याआधी सुलतानपुरी-कांझावाला प्रकरणातील आणखी एक आरोपी आशुतोषला अटक करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्लीत असलेल्या कांझावाला येथे वर्षाच्या पहिल्याच दिवशी 20 वर्षीय अंजली सिंगचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. घटनेत एका कारने अंजलीच्या स्कूटीला धडक दिली. त्यानंतर जवळपास 10 ते 12 किलोमीटर ती कारसोबत फरफटत गेली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हेही वाचा - शरिरावर 40 जखमा, छिन्नविछिन्न मृतदेह 12 किमी फरफटत गेला, कसा आणि कुठे झाला अपघात दिल्लीत 1 जानेवारीच्या पहाटे झालेल्या अपघातात तिच्या स्कूटीला कारने धडक दिली होती. यात कारखाली अडकलेल्या अंजलीला चालकाने दूरपर्यंत फरफटत नेल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. मौलाना आझाद मेडिकल कॉलेज (MAMC) येथील डॉक्टरांच्या टीमने तिचं पोस्ट मॉर्टेम केलं. अंजलीच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्याची माहिती त्यांनी दिल्ली पोलिसांना दिली.