PM Modi in Kedarnath: 2013 च्या विनाशकारी प्रलयानंतर उद्ध्वस्त झालेल्या केदारनाथ मंदिर परिसराची डागडुजी करण्यात आली आहे. केदारनाथ भेटीसाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामाचं श्रेय बाबा केदार यांना दिलं आहे. हे दशक उत्तराखंडचं असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये केदारनाथाचं दर्शन घेतलं. या दौऱ्यात त्यांनी आदि गुरू शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरणही केलं. यावेळी पंतप्रधानांनी केदारनाथसाठी 400 कोटींच्या विविध कामांची घोषणाही केली. केदारनाथच्या पुनर्निमाण कार्यावर स्वतः पंतप्रधान लक्ष ठेऊन असल्याचं सांगितलं जातं.
केदारनाथाचं लवकरच पुनर्निमाण होईल याचा आपल्याला विश्वास वाटत होता, असं 2013 सालच्या नैसर्गिक आपत्तीबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला आणि भीम शीलेपर्यंत ते गेले. ही शीळा आपत्तीच्या वेळी खाली कोसळली होती.
पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण केलं. एकाच शीळेतून तयार करण्यात आलेली ही शंकराचार्यांची मूर्ती बारा फूट उंच आहे. या मूर्तीसमोर बसून पंतप्रधानांनी प्रार्थना केली.
पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलेल्या अनावरण कार्यक्रमाचं देशातील चारही पीठांमध्ये थेट प्रसारण करण्यात आलं.
गुरु शंकराचार्यांची मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न अनेक मूर्तीकारांनी केला होता. जाणकारांच्या माहितीनुसार या मूर्तीचे जवळपास 18 मॉडेल तयार करण्यात आले होते. त्यानंतर पंतप्रधानांच्या पसंतीचं एक मॉडेल निश्चित करण्यात आलं.
सप्टेंबर महिन्यात चिनूक हेलिकॉप्टरमधून ही मूर्ती केदारनाथमध्ये आणण्यात आली. ज्या दगडात ही मूर्ती कोरली गेली तो दगड होता 130 टनांचा. मूर्ती कोरल्यानंतर त्याचं वजन झालं 35 टन.
2013 सालानंतर केदारनाथमध्ये जी काही सुधारणा झाली, त्याचं श्रेय पंतप्रधानांनी बाबा केदार यांना दिलं. हे दशक केदारनाथचं असून आगामी काळात कनेक्टिव्हिटीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.