JOIN US
मराठी बातम्या / देश / ...तरच भारत-चीन संबंध सुधारतील, परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक मत

...तरच भारत-चीन संबंध सुधारतील, परराष्ट्र मंत्र्यांचं रोखठोक मत

भारत आणि चीन सीमेवरील भागात शांतता आणि स्थैर्य असेल, तरच दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध चांगले राहतील, असं स्पष्ट मत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : भारत आणि चीन सीमेवरील भागात शांतता आणि स्थैर्य असेल, तरच दोन्ही देशांचे द्विपक्षीय संबंध चांगले राहतील, असं स्पष्ट मत केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केलं. द्विपक्षीय संबंधांसाठी दोन्ही देशांच्या सीमेवरील शांतता आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सेंटर फॉर कंटेम्पररी चायना स्टडीजनं (CCCS) आयोजित केलेल्या एका परीषदेत ते बोलत होते. सीमेबाबतचे प्रश्न सोडवताना वेळोवेळी हा तणाव हेतुपुरस्सर वाढवला गेला, असंही ते म्हणाले. जून 2020मध्ये गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या लष्करामध्ये झालेल्या संघर्षाचा हवाला देऊन ते म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांपासून उभय देशांच्या सीमांवर असलेला तणाव दोन्ही देशांसाठी हितकारक नाही. भारत आणि चीनमधील संबंध जपण्याच्या दृष्टीनं गेला काही काळ अतिशय आव्हानात्मक होता. तसाच तो भारतीय उपखंडातील इतर देशांसाठीही त्रासदायक होता.’ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं लडाख सीमाभागात फिंगर एरिया, गलवान खोरं, हॉट स्प्रिंग्ज आणि कोंगरुंग नाला या भागांमध्ये घुसखोरी केल्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनी चिनी जवानांना मागे ढकलत देशाच्या सीमेचं रक्षण केलं होतं. त्या सक चकमकीनंतर हे संबंध आणखीनच ताणले गेले. “ही कोंडी अशीच राहिली, तर त्याचा कोणालाही फायदा होणार नाही.न्यू नॉर्मल परिस्थिती सगळीकडे स्वीकारली जात आहे ती स्वीकारली गेली पाहिजे,” असंही जयशंकर म्हणाले. “भारताचं आधीचं धोरण संयमाचं असल्यामुळे भारतीय धोरणांना आव्हान देऊ शकतो, असं इतरांना वाटत होतं. मात्र आता तो काळ मागे पडला आहे. आता केवळ चीनसाठीच नाही, तर सर्वांसाठी भारताचं हे नवं युग आहे,” असंही त्यांनी सांगितलं. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणांना बळ द्यायला हवं असंही त्यांनी सुचवलं. त्याचबरोबर भारताने आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी सदैव सज्ज राहिलं पाहिजे. आपल्या शेजारच्या देशांशी लढण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले. आशियाई देशांमधील एकात्मता टिकवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील वादाचा फायदा इतर देशांना मिळू नये म्हणून भारतानं चीनसोबतचे द्विपक्षीय संबंध ठरवून सुधारण्याचा प्रयत्न केला असंही जयशंकर म्हणाले. हे सांगतानाच त्यांनी दोन्ही देशांच्या भौगोलिक परिस्थितीचा संदर्भ दिला. ते म्हणाले, ‘भारत आणि चीन या देशांतील मतभेदाचा विचार केला तर गेल्या 60 वर्षांत या दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या भौगोलिक मतभेदांमुळेच आजची परिस्थिती उद्भवली आहे. त्यातला एक मुद्दा म्हणजे सीमा वादाबद्दल समतोल भूमिका (Cumulative Border Balance) आणि दुसरा मुद्दा म्हणजे सर्वसमावेशक राष्ट्रीय शक्ती (Comprehensive National Power).’ भारत आणि चीनमधील संबंध सुधारण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांच्या सीमेवरील तणाव कमी झाला पाहिजे, अशी अपेक्षा जयशंकर यांनी या कार्यक्रमावेळी व्यक्त केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या