नवी दिल्ली, 18 जुलै : महाराष्ट्रामध्ये गेल्या महिन्याभरात मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आमदार आणि अपक्ष अशा एकूण 50 आमदारांनी बंड केलं, ज्यामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यातल्या या राजकीय भुकंपाला महिना उलटत नाही तोच दिल्लीतही शिवसेनेला धक्का बसू शकतो. शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार शिंदे गटात सामील होण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे दिल्लीमधलं राजकारण तापलेलं असताना राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष महाविकासआघाडीचे जनक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीला केंद्रीय सहकार विभागाचे अधिकारी गेले होते. स्वत: शरद पवार यांनी या भेटीचा फोटो ट्वीट केला आहे.
‘सहकार मंत्रालयाचे प्रतिनिधी मला नवी दिल्लीमध्ये भेटायला आले होते. सहकार क्षेत्रातला माझा अनुभव सांगण्याची विनंती त्यांनी मला केली. सहकार मंत्रालयाच्या प्रभावी कामकाजासाठी त्यांनी माझ्याकडे सल्ला मागितला. महाराष्ट्रामध्ये मी सहकार क्षेत्राशी जवळून जोडला गेलो आहे, त्यामुळे मी त्यांना पूर्ण पाठिंब्याचा विश्वास दिला,’ असं शरद पवार म्हणाले. केंद्र सरकारने 2021 साली केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हेच केंद्रीय सहकार मंत्रीदेखील आहेत.