नवी दिल्ली, 22 जुलै: दिल्लीत (New Delhi) आजपासून शेतकरी आंदोलन (Farmers Protest) करणार आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी हे आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना दिल्लीतल्या जंतर- मंतरवर ( Jantar Mantar) आंदोलनासाठी परवानगी (Farmers have been permitted to protest) मिळाली आहे. त्यानुसार शेतकरी आजपासून म्हणजेच 22 जुलैपासून 9 ऑगस्टपर्यंत आंदोलन करतील. आंदोलनासाठी वेळही देण्यात आली आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही वेळ असेल. काही अटींवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापनानं शेतकऱ्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.
आंदोलनासाठी दिलेल्या परवानगीनुसार दिल्लीत जंतर- मंतरवर रोज 200 शेतकऱ्यांना आंदोलन करता येईल. तसंच कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकऱ्यांना जंतर- मंतरवर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे.
पोलिसांच्या कडक बंदोबस्तात सिंघू सीमेवरून शेतकऱ्यांना जंतर-मंतर येथे आणलं जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे विरोधक सरकारला शेतकरी आंदोलनावरुनही घेरण्याचा प्रयत्न करतील. महागाई, कोरोना महामारी आणि कोरोनाने होणारे मृत्यू अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी संसदेत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात आता शेतकरी आंदोलनाचीही भर पडेल.